आखाडा लाईव्ह | जळगाव:
जिल्ह्यात एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आणि राजकीय घडामोडी रंगात आलेल्या असतानाच, अमळनेर तालुक्यातून भारतीय जनता पक्षासाठी (भाजप) एक अतिशय निराशाजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. कधीकाळी भाजपचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमळनेरमध्ये भाजपच्या विद्यमान खासदार स्मिता वाघ यांना सलग दुसरा मोठा राजकीय फटका बसला आहे.
अमळनेर शेतकी संघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार अनिल पाटील यांनी खासदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे.
📊 अमळनेर शेतकी संघ निवडणूक निकाल एका दृष्टिक्षेपात:
| एकूण जागा | आमदार अनिल पाटील (सहकार पॅनल) | काँग्रेस | खासदार स्मिता वाघ (भाजप प्रणित पॅनल) |
| १५ | १० जागा (दणदणीत विजय) | ०३ जागा | केवळ ०२ जागा (समाधान) |
📉 आधी चौधरी, आता पाटील; भाजपची पीछेहाट सुरूच…
खासदार स्मिता वाघ यांच्या स्वतःच्या होमग्राऊंडवर म्हणजेच अमळनेर तालुक्यात झालेला हा भाजपचा दुसरा मोठा पराभव आहे.
-
पहिला धक्का: याआधी डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या अमळनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रणित आघाडीचा दारुण पराभव केला होता.
-
दुसरा धक्का: शिरीष चौधरींनी दिलेला तो धक्का भाजप पचवत नाही तोच, आता शेतकी संघावर आमदार अनिल पाटील यांच्या पॅनलने एकहाती वर्चस्व मिळवत भाजपला चारीमुंड्या चीत केले आहे.
या निवडणुकीत महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपक्ष पेक्षा विरोधी पक्षातील काँग्रेसने (३ जागा) अधिक चांगली कामगिरी केल्याचे चित्र समोर आले आहे.
खासदार स्मिता वाघ यांचे नेतृत्व अपयशी?
सहकार क्षेत्रातील निवडणुका या जरी अधिकृत पक्षीय चिन्हावर लढवल्या जात नसल्या, तरी पॅनलचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याची प्रतिष्ठा यात थेट पणाला लागलेली असते. स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागल्याने, हा थेट खासदार वाघ आणि पर्यायाने भाजपचाच पराभव मानला जात आहे.
गेल्या दोन वर्षांत अमळनेर तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आपली ताकद सातत्याने वाढवत आहेत, तर दुसरीकडे भाजप मात्र कुठेतरी बॅकफूटवर जाताना दिसत आहे. आपला स्वतःचा गड ढासळत असताना तो सावरण्यात व स्थानिक पातळीवर पक्षाची घसरगुंडी रोखण्यात खासदार स्मिता वाघ पूर्णपणे अपयशी ठरत असल्याची चर्चा आता जळगावच्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे.


