मुंबई (आखाडा नेटवर्क) : विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या ११ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. विशेष म्हणजे, या यादीमध्ये नंदकिशोर महाजन यांच्या नावाचा समावेश असून, ‘आखाडा लाईव्ह’ने यापूर्वीच दिलेल्या बातमीवर यामुळे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
भाजपने या निवडणुकीत राजकीय समीकरणे साधत काही ठिकाणी पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या निष्ठावंतांना, तर काही ठिकाणी नुकतेच पक्षात दाखल झालेल्या ‘आयात’ उमेदवारांना संधी देऊन धक्कातंत्राचा वापर केला आहे.
भाजपच्या उमेदवारांची मतदारसंघांनुसार सविस्तर यादी:
| मतदारसंघ | उमेदवार |
| जळगाव | श्री. नंदकिशोर महाजन |
| वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली | श्री. अरुण लखानी |
| भंडारा-गोंदिया | श्री. अविनाश ब्राह्मणकर |
| अमरावती | श्री. प्रविण पोटे पाटील |
| सांगली-सातारा | श्री. धैर्यशील कदम |
| सोलापूर | श्री. राजेंद्र राऊत |
| अहिल्यानगर | श्री. प्राजक्त तनपुरे |
| छत्रपती संभाजीनगर-जालना | श्री. सुहास शिरसाट |
| नांदेड | श्री. अमर राजूरकर |
| धाराशिव-लातूर-बीड | श्री. बसवराज पाटील |
| नागपूर | डॉ. राजीव पोतदार |
निष्ठावंत विरुद्ध आयात उमेदवारांचा समतोल
या यादीत अनेक दिग्गजांना आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. जळगावमधून नंदकिशोर महाजन यांच्या नावाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती, त्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. तर दुसरीकडे, सोलापूरमधून राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे आणि सांगली-साताऱ्यातून धैर्यशील कदम यांच्या उमेदवारीमुळे संबंधित जिल्ह्यांतील राजकीय वातावरण कमालीचे तापण्याची शक्यता आहे.
‘आखाडा लाईव्ह’चा अचूक अंदाज:
विधान परिषदेच्या या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजप कोणाला मैदानात उतरवणार, याबाबत ‘आखाडा लाईव्ह’ने आधीच वृत्त दिले होते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या यादीमुळे ‘आखाडा लाईव्ह’ची ती बातमी तंतोतंत खरी ठरली आहे.
सर्व ११ जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून, या उमेदवारी जाहीर झाल्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार आहे.


