आखाडा | मुंबई: भाजपचे संकटमोचक आणि महाराष्ट्राचे ग्रामविकास व जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे आपल्या विधानांमुळे पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अमृतसर येथील ‘दमदमी टाकसाल’च्या मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना महाजन यांनी १९८४ मधील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ या लष्करी कारवाईला “काळा दिवस” (Black Day) संबोधले आहे. तसेच, सुवर्ण मंदिरात मारल्या गेलेल्यांना “शहीद/हुतात्मे” म्हटल्याने महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सुवर्ण मंदिरावरील कारवाई चुकीची; अहमदशाह अब्दालीशी तुलना
अमृतसरमध्ये ऑपरेशन ब्लू स्टारच्या ४२ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी हजेरी लावली होती. अशा कार्यक्रमात सहभागी होणारे ते देशातील कोणत्याही राज्य सरकारचे पहिलेच मंत्री ठरले आहेत.
यावेळी बोलताना महाजन म्हणाले,
“आमच्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार हा एक ‘काळा दिवस’ आहे. यात आपले अनेक भाऊ-बहीण शहीद झाले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लष्कराला जबरदस्तीने पंजाब आणि पवित्र सुवर्ण मंदिर परिसरात पाठवले, हा शीख समाजाच्या पवित्र स्थळावर झालेला लष्करी हल्ला होता.”
इतकेच नव्हे तर, महाजन यांनी या लष्करी कारवाईची तुलना १८व्या शतकातील परकीय आक्रमक अहमदशाह अब्दालीने सुवर्ण मंदिरावर केलेल्या हल्ल्याशी केली. या घटनेतील दोषींना अद्याप शिक्षा झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. या कार्यक्रमाच्या मंचावर जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि इतर खलिस्तानवाद्यांचे पोस्टर्स लावलेले होते, हे विशेष.
विरोधक आक्रमक; महाजनांच्या हकालपट्टीची मागणी
गिरीश महाजन यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील नेते प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी महाजन आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
भाजप बॅकफूटवर जाण्याची शक्यता
गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचा दावा केला असून, पुढील वर्षी मुख्यमंत्र्यांनाही सोबत आणू असे म्हटले आहे. मात्र, भारतीय लष्कराने देशाच्या सुरक्षेसाठी केलेल्या कारवाईला आणि दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेला ‘काळा दिवस’ म्हटल्याने आता भाजपवरही दुटप्पी भूमिकेचा आरोप होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हा मुद्दा येत्या काळात अधिक तापण्याची चिन्हे आहेत.


