आखाडा | मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ज्याची आतुरतेने प्रतीक्षा होती, तो मान्सून अखेर ४ जून रोजी दुपारी केरळमध्ये दाखल झाला आहे. हवामान अंदाज वर्तवणारी संस्था ‘स्कायमेट’चा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून, मान्सूनने वेळेत हजेरी लावली आहे. यंदा मान्सूनला ३ ते ४ दिवसांचा उशीर झाला असला, तरी त्याची सुरुवातीची गती अत्यंत समाधानकारक आणि वेगवान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किंवा नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ महेश पालावत यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार?
स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत मान्सून गोवा, कर्नाटक आणि तळ कोकणात प्रवेश करेल. तर १० जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. ८ जुलैपर्यंत दरवर्षीप्रमाणे मान्सून संपूर्ण भारतात दाखल होईल. १५ जूनच्या आसपास तो बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये पोहोचेल.
कोकण किनारपट्टीवर मुसळधार; मुंबईत रिमझिम
अरबी समुद्राकडून येणारे पश्चिमेक्रेचे वारे वेगाने वाहत असल्यामुळे ५ आणि ६ जून रोजी कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि डहाणू या संपूर्ण किनारपट्टीच्या भागात मान्सूनचा जोर प्रचंड वाढणार आहे.
-
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग: या जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा (Alert) देण्यात आला आहे. ताशी ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
-
पालघर, ठाणे, मुंबई: या भागात मात्र केवळ रिमझिम पावसाच्या सरी बरसतील.
-
पश्चिम महाराष्ट्र: वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
चक्राकार हवेची स्थिती; ७ जूननंतर पाऊस वाढणार
६ जूनच्या सुमारास उत्तर अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील मराठवाडा परिसरात एक चक्राकार हवेची स्थिती (Cyclonic Circulation) निर्माण होत आहे. यामुळे या भागात पावसाचा वेग वाढेल. ७ जून रोजी उत्तर भारतातील पाऊस काहीसा कमी होईल, मात्र महाराष्ट्राच्या अनेक भागांत पावसाचा जोर आणखी वाढून मान्सून वेगाने पुढे सरकेल.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अद्याप प्रतीक्षा; उन्हाचा चटका कायम
एकीकडे कोकणात पावसाची शक्यता असताना, दुसरीकडे पाऊस पडूनही हवेतील गारवा अजून वाढलेला नाही. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील नागरिकांना पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अद्याप मुसळधार पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
तापमानाची नोंद: चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे तापमान अद्यापही 44 अंश सेल्सिअस ते 46 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले आहे.
यंदा मान्सूनवर ‘अल निनो’चे सावट असल्यामुळे, मान्सूनचा पुढील प्रवास सुरळीत होणार की त्यात काही अडथळे येणार, याबाबत बळीराजा सध्या चिंतेत आहे. मात्र, मान्सूनची सध्याची वेगवान चाल पाहता हवामान तज्ज्ञांनी सकारात्मक चित्र वर्तवले आहे.


