आखाडा लाईव्ह | जळगाव : जिल्ह्यात एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील नाराज असलेल्या नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारची घुसमट दिसून येत आहे. आखाडा लाईव्ह च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव सेना व राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक जण सत्ताधारी भाजप व शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
चोपड्याचे माजी आमदार धनुष्यबाण गळ्यात अडकवणार!
दुसरीकडे, चोपडा तालुक्यातही महाविकास आघाडीला मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे. चोपडा तालुक्यातील एका माजी आमदारांसह माजी जिल्हा परिषद सदस्य आणि इतर प्रमुख पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
गुप्त भेटीने राजकीय चर्चांना उधाण: सूत्रांच्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील या माजी आमदारांनी नुकतीच शिवसेनेचे नेते व माजी खासदार उन्मेष पाटील यांची गुप्त भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची तीव्र इच्छा दर्शवल्याचे समजते. या भेटीमुळे चोपड्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत.
आगामी काळात आणखी ‘इनकमिंग’ होणार!
जिल्ह्यात सध्या केवळ या दोनच तालुक्यांची चर्चा असली, तरी आगामी काळात महाविकास आघाडीतील आणखी अनेक मोठे चेहरे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात होणारे हे पक्षांतर महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवणारे, तर सत्ताधारी महायुतीची ताकद वाढवणारे ठरणार आहे. आता हे हायप्रोफाईल प्रवेश नेमके कधी आणि कोणाच्या उपस्थितीत होतात, याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


