आखाडा लाईव्ह । जळगाव (विशेष प्रतिनिधी) : जळगाव शहरात सध्या ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात निकृष्ट दर्जाचे रस्ते बनत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जात असतानाही प्रशासन ढिम्म आहे. भ्रष्टाचाराचा असाच एक धक्कादायक आणि कळस गाठणारा प्रकार शहरातील बजरंग बोगदा परिसरात उघडकीस आला आहे. या ठिकाणी रात्रीच्या अंधारात घाईघाईने बनवण्यात आलेला डांबरी रस्ता चक्क दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक नागरिकांनी हाताने उखडून दाखवला. या प्रकारामुळे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा (PWD) अत्यंत भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
रात्रीतून थातूरमातूर काम, सकाळी पोलखोल!
मिळालेल्या माहितीनुसार, बजरंग बोगदा परिसरात रस्ता डांबरीकरणाचे काम अत्यंत घाईगडबडीत आणि निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. डांबर आणि खडीचे प्रमाण योग्य नसल्याने रस्ता केवळ नावालाच बनवला गेल्याचे स्पष्ट दिसत होते. सकाळी जेव्हा स्थानिक नागरिकांनी रस्त्याची पाहणी केली, तेव्हा रस्त्याचा थर हाताने सहज उखडला जात असल्याचे समोर आले. सजग नागरिकांनी तात्काळ याचे व्हिडिओ बनवून प्रशासनाच्या कामाची पोलखोल केली.
हेवीवेट पदाधिकाऱ्यांच्या प्रभागातच भ्रष्टाचार?
विशेष म्हणजे, ज्या भागात हा रस्ता तयार करण्यात आला, तो परिसर शहरातील हेवीवेट लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे “अशा वजनदार नेत्यांच्या प्रभागातच जर इतका उघड माजलेला भ्रष्टाचार चालत असेल, तर सामान्य जळगावकर कोणाकडे दाद मागणार?” असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
कडक कारवाईची मागणी; PWD धाडस दाखवणार का?
या गंभीर प्रकारानंतर संबंधित ठेकेदाराचे परवाना रद्द करून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, नेहमीप्रमाणे याही वेळी प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालणार की सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महापालिका त्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार? याकडे संपूर्ण जळगावकरांचे लक्ष लागले आहे.
-
”शहरात जनतेच्या कराच्या पैशांची सर्रास लूट सुरू आहे. रात्रीतून रस्ता बनतो आणि सकाळी तो हाताने उखडला जातो, यापेक्षा मोठा पुरावा भ्रष्टाचाराचा काय असू शकतो? महापालिका आणि PWD ने तात्काळ या कामाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत”
-
— दीपककुमार गुप्ता (सामाजिक कार्यकर्ते, जळगाव)
-
“आम्ही सकाळी उठून पाहिलं तर रस्त्याची चाळण झाली होती. पाय मारला तरी डांबर निघत होतं. हा आमच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे. अशा निकृष्ट कामांमुळे रस्ता महिनाभरही टिकणार नाही. संबंधित ठेकेदारावर त्वरित कारवाई झाली पाहिजे.”
-
— गोपाल चौधरी (स्थानिक नागरिक)


