जळगाव (आखाडा नेटवर्क): महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट होऊ पाहणाऱ्या गावांच्या विकासाचा मार्ग आता अधिक प्रशस्त होणार आहे. जळगाव शहरालगत असलेल्या मोहाडी, कुसुंबा, निमखेडी आणि सावखेडा या गावांना लवकरच ‘शहरी’ ओळख मिळण्याची दाट शक्यता आहे. यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे, येथील जमिनींचा पारंपरिक ७/१२ उतारा आता कायमचा इतिहासजमा होणार असून, त्याऐवजी ग्रामस्थांना अधिकृत ‘प्रॉपर्टी कार्ड’ (मिळकतपत्रिका) दिले जाणार आहे. यासह वरील आव्हाणे मोहाडी, कुसुंबा आणि सावखेडा या चार गावांचा समावेश मनपा हद्दीत करण्याचाही हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत
नागरिकांना होणार ‘हे’ मोठे फायदे : राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण धोरणामुळे महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील वाढीव गावांना आणि तेथील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
- मालकी हक्क स्पष्ट, वादांना पूर्णविराम: ‘प्रॉपर्टी कार्ड’ हाती आल्याने जमिनीची अधिकृत मालकी स्पष्ट होईल. यामुळे हद्दवाढ आणि वारसा हक्काचे वर्षानुवर्षे चालणारे वाद कायमचे मिटतील.
- पारदर्शक खरेदी-विक्री: जागांची खरेदी-विक्री प्रक्रिया अत्यंत सुलभ, गतिमान आणि पारदर्शक होणार आहे.
- कर्ज मिळणे झाले सोपे: मालमत्तेची डिजिटल नोंद उपलब्ध झाल्यामुळे बँकांकडून गृहकर्ज (Home Loan) किंवा तारण कर्ज मिळवणे नागरिकांसाठी अत्यंत सुपे होईल.
- पायाभूत सुविधांचा विकास: शहरीकरणामुळे या गावांमध्ये रस्ते, सुनियोजित पाणीपुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्था यांसारख्या नागरी सुविधांचे योग्य नियोजन प्रशासनाला करता येईल.
अंतिम मंजुरीसाठी ‘या’ प्रक्रिया पार पाडाव्या लागणार
प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असल्या तरी या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी काही कायदेशीर टप्पे पार करावे लागणार आहेत.
हद्दवाढीसाठी सर्वप्रथम स्थानिक नागरिकांची मान्यता घेतली जाईल. त्यानंतर जाहीर जनसुनावणी घेतली जाईल. संबंधित ग्रामपंचायतींचे ठराव मंजूर झाल्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला जाईल. शासनाच्या अंतिम मंजुरीनंतरच या गावांसाठी ‘शहरी’करणाचा अधिकृत शिक्कामोर्तब होईल.
या निर्णयामुळे जळगाव शहराच्या विस्ताराला एक नवी दिशा मिळणार असून, संबंधित ५ गावांचा कायापालट होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.


