जळगाव (आखाडा नेटवर्क) : सध्या कडक उन्हाळा असला तरी आगामी काळात जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. जानेवारी महिन्यात मुदत संपलेल्या आणि सद्यस्थितीत प्रशासक राजवटीखाली असलेल्या जिल्ह्यातील तब्बल ७९१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या ऑगस्ट महिन्यात होणार आहेत. ऐन पावसाळ्यात ग्रामीण भागातील हा राजकीय आखाडा रंगणार असल्याने जिल्हाभरात आतापासूनच हालचालींना वेग आला आहे. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकांसाठी १२ जून रोजी ग्रामपंचायत सदस्यांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर १० जुलै रोजी अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षित जागांची अधिकृत घोषणा केली जाईल. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्ष मतदानाचा थरार रंगेल.
📅 असा असेल निवडणूकपूर्व कार्यक्रम :
१२ जून: ग्रामपंचायत सदस्यपदासाठी आरक्षण सोडत.
१० जुलै: अंतिम प्रभाग रचना व आरक्षित जागांची प्रसिद्धी.
ऑगस्ट महिना: प्रत्यक्ष निवडणूक आणि रणधुमाळी.
📊 तालुकावार पात्र ग्रामपंचायतींची संख्या :
जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये पाचोरा तालुक्यात सर्वाधिक (९६) तर भुसावळ तालुक्यात सर्वात कमी (२६) ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.
तालुकावार सविस्तर आकडेवारी खालीलप्रमाणे:
पाचोरा (९६), धरणगाव (४७), चाळीसगाव (८३), यावल (४७), जामनेर (७४), जळगाव (४२), अमळनेर (६७), एरंडोल (३७), पारोळा (५८), भडगाव (३३), चोपडा (५२), बोदवड (२९) मुक्ताईनगर (५२), भुसावळ (२६), रावेर (४८), एकूण ग्रामपंचायती – ७९१
प्रशासक राज संपणार, गावोगावी मोर्चेबांधणी सुरू!
गेल्या काही महिन्यांपासून या ७९१ ग्रामपंचायतींवर प्रशासक काम पाहत आहेत. आता निवडणुकांचे बिगुल वाजल्यामुळे स्थानिक पुढाऱ्यांची आणि इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. १२ जूनच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आपल्या हक्काचा वॉर्ड कोणासाठी राखीव होतो यावरच अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. पाऊस कितीही असला, तरी यंदा गावागावांतील राजकीय पारा मात्र कमालीचा वाढणार हे निश्चित!


