जळगाव (पंकज पाटील) : गेल्या महिनाभरापासून जळगाव जिल्ह्यातील शेतकरी खंडित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयावर एक आगळेवेगळे ठिय्या आंदोलन करण्यात आले. राजकीय पक्षांचा आक्रमक पवित्रा आणि शेतकऱ्यांचा वाढता दबाव यापुढे अखेर वीज वितरण कंपनीला नमावे लागले असून, जळगाव ग्रामीण व चाळीसगावसह संपूर्ण जिल्ह्यात सलग ८ तास वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे लेखी आश्वासन महावितरणने दिले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आणि कायदेशीर इशारा
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या वतीने महावितरणसमोर दोन प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या:
१. शेतकऱ्यांना शेतीसाठी कोणत्याही खंडेशिवाय सलग १० तास वीजपुरवठा मिळालाच पाहिजे.
२. विद्युत कायदा २००३ च्या कलम ४३ आणि ५७ नुसार सुरळीत वीज मिळणे हा ग्राहकांचा (शेतकऱ्यांचा) कायदेशीर हक्क आहे.
यावेळी बोलताना शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी महावितरणच्या कारभारावर कडाडून टीका केली. “गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला विस्कळीत वीजपुरवठा हा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) च्या गुणवत्ता मानकांचा (SOP) थेट भंग आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, हा पुरवठा त्वरित सुरळीत न झाल्यास आम्ही ग्राहक तक्रार निवारण मंच (CGRF), विद्युत लोकपाल आणि ग्राहक न्यायालयात भरपाईसाठी कायदेशीर दावा दाखल करू,” असा इशारा प्रा. सोनवणे यांनी दिला.
महावितरणकडून लेखी आश्वासन; आंदोलन यशस्वी
आंदोलनाची तीव्रता पाहता महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी जळगाव ग्रामीण, चाळीसगावसह जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सलग ८ तास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत असल्याचे आश्वासन दिले. तसेच वीज वितरण कंपनीच्या वतीने कार्यकारी अभियंत्यांनी आंदोलकांना यासंबंधीचे लेखी पत्र सुपूर्द केले. महावितरणने नमती भूमिका घेतल्याने अखेर हे आंदोलन यशस्वी झाले.
आंदोलनात ‘या’ प्रमुख नेत्यांची होती उपस्थिती
या आंदोलनात शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षा कल्पिताताई पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, माजी अध्यक्ष अशोक लाडवंजारी, एजाज मलिक, महेश बोरसे, महानगर तालुकाध्यक्ष रिंकू चौधरी, संग्राम पाटील, प्रेमराज राठोड, योगेश पाटील, डॉ. रमाकांत कदम, प्रमोद सोनवणे, स्वप्नील राजपूत, सुमित सपकाळे, संजय जाधव, वाय. एस. महाजन, हिलाल पाटील, बाळू धनगर, बाळू पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


