जळगाव (मंगेश चौधरी) : राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीच्या जागावाटपात जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) यांच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशातच, शिवसेनेचे युवा नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आले असून नव्या समीकरणांची नांदी सुरू झाली आहे.
सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि कामाचा दांडगा अनुभव :
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा राजकीय वारसा लाभलेले प्रतापराव पाटील यांनी गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. केवळ वारशावर विसंबून न राहता त्यांनी वैयक्तिक कार्यशैली, दांडगा जनसंपर्क आणि कुशल संघटन कौशल्याच्या जोरावर युवक, शेतकरी आणि महिला वर्गात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासकामांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. त्यातच जिल्हा परिषद सदस्य म्हणून मिळालेला स्थानिक स्वराज्य संस्थांचा अनुभव त्यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे. अलीकडच्या काळात त्यांनी संपूर्ण जिल्हाभर वाढवलेला संपर्क आणि संघटनात्मक बांधणी यामुळे संभाव्य उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव सध्या सर्वात आघाडीवर आहे.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण :
महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ही जागा शिवसेनेला सुटणार असल्याचे संकेत मिळताच प्रतापराव पाटील यांनी अर्ज उचलून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. या घडामोडीमुळे शिवसेना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत असून, सोशल मीडियावरूनही त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले जात आहे.
उत्सुकता शिगेला: अधिकृत उमेदवारीबाबत अंतिम शिक्कामोर्तब महायुतीचे वरिष्ठ नेते आणि शिवसेनेचे पक्षश्रेष्ठी करणार असले, तरी सध्या जळगावच्या राजकीय पटलावर प्रतापराव पाटील यांच्याच नावाची सर्वाधिक चर्चा आहे. त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवरून होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
जळगाव विधान परिषद निवडणूक : प्रतापराव पाटील यांनी घेतला उमेदवारी अर्ज; जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग
महायुतीत जळगावची जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता; पक्षश्रेष्ठींच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष


