आखाडा | अमळनेर: येथील चोपडा रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेल्या खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुण मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण अमळनेर शहरासह सिंधी कॉलनी परिसरावर शोककळा पसरली आहे.
मित्रांसोबत पोहण्याचा बेत ठरला जीवघेणा
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमळनेर येथील सिंधी कॉलनी परिसरातील तीन तरुण मित्र चोपडा रस्त्यावरील रेल्वे ब्रिज जवळील खदानीच्या साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही जण खोल पाण्यात बुडू लागले. आजूबाजूला असलेल्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. तिन्ही तरुणांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला.
मृतांची नावे:
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृत पावलेले तिन्ही तरुण सिंधी कॉलनीतील रहिवासी असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
-
मानव बंटी रत्नानी
-
कार्तिक विक्की उधवानी
-
दिनेश विजय पंजवानी
शहरावर शोककळा ऐन उमेदीच्या काळात तीन तरुण मित्रांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने सिंधी समाज आणि संपूर्ण अमळनेर तालुक्यात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.


