आखाडा | जळगाव : विधान परिषद निवडणुकीची धामधूम आणि राजकीय घडामोडी शिगेला पोहोचल्या असतानाच, जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. यावल नगरपालिकेच्या ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष छाया पाटील या लवकरच भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आज त्यांनी पती अतुल पाटील यांच्यासह जळगाव येथील भाजप कार्यालयात जात राज्याचे संकटमोचक आणि संकट निवारक मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने या चर्चांना कमालीचे उधाण आले आहे.
भाजप कार्यालयात बंद दाराआड खलबते!
आज जळगाव येथील भाजप कार्यालयात छाया पाटील आणि त्यांचे पती अतुल पाटील अचानक दाखल झाले. त्यांनी थेट मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाली. या गुप्त चर्चेत नेमके काय घडले आणि कोणत्या मुद्द्यांवर शिक्कामोर्तब झाले, हे अद्याप अधिकृतपणे समजू शकले नसले, तरी छाया पाटील यांच्या भाजप प्रवेशावर यात अंतिम मोहर उमटल्याचे बोलले जात आहे.
अनेक दिवसांपासून सुरू होते प्रयत्न
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छाया पाटील यांच्या भाजप प्रवेशासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पडद्यामागे जोरदार हालचाली आणि प्रयत्न सुरू होते. अखेर आज मंत्री महाजन यांच्यासोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण भेटीमुळे या सर्व चर्चांवर आता प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या एका मोठ्या महिला पदाधिकाऱ्याने भाजपची वाट धरल्याने महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
उद्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याच उपस्थितीत छाया पाटील यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश सोहळा पार पडेल, असे खात्रीलायक तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत.
छाया पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे यावल आणि जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, आता उद्याच्या अधिकृत घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


