जळगाव: जळगावच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला गती आलेली असतानाच, जळगावच्या राजकारणातील सस्पेन्स कमालीचा वाढला आहे. अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या रेश्मा काळे अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्या आहेत. दुसरीकडे, जळगावातील एका नामांकित हॉटेलमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक सुरू झाली असून, यामुळे ‘ऑपरेशन माघार’ सक्रिय झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
हॉटेलमध्ये महायुतीच्या नेत्यांची गुप्त बैठक
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगावातील हॉटेलमध्ये महायुतीचे सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी एकत्र आले आहेत. या बंद दाराआड सुरू असलेल्या बैठकीत बंडखोरी शमवण्यासाठी आणि मित्रपक्षांमधील समन्वय साधण्यासाठी काय रणनीती आखायची, यावर खलबतं सुरू आहेत. विरोधकांचे मन वळवून त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी नेत्यांनी पूर्ण ताकद पणाला लावल्याचे दिसते आहे.
रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’ झाल्याने खळबळ
या संपूर्ण घडामोडींमध्ये रेश्मा काळे या ‘नॉट रिचेबल’ झाल्यामुळे महायुतीसह विरोधकांच्या गोटातही धाकधूक वाढली आहे. काळे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मतदारसंघातील गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आता ऐन महत्त्वाच्या क्षणी त्यांचा फोन बंद येत असल्याने त्या नेमकी काय भूमिका घेणार? त्या महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत की त्यांनी वेगळीच रणनीती आखली आहे? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
‘ऑपरेशन माघार’ यशस्वी होणार का?
निवडणुकीच्या रिंगणातून बंडखोरांना आणि अपक्षांना बाजूला सारून थेट लढत व्हावी, यासाठी महायुतीकडून हे ‘ऑपरेशन माघार’ राबवले जात असल्याचे बोलले जात आहे. आजच्या या बैठकीनंतर जळगावच्या राजकारणाला कोणती नवी कलाटणी मिळते आणि रेश्मा काळे काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.


