आखाडा | जळगाव : दि. ११ जून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांकडून लाभ मिळेपर्यंत व्याज आकारणी करू नये, असा शासनाचा स्पष्ट आदेश असतानाही जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने व्याज वसुली केल्याचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने विभागीय सहनिबंधक, नाशिक यांना संबंधित बँकेविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
झुरखेडा (ता. धरणगाव) येथील लोकनियुक्त सरपंच श्री. सुरेशआप्पा गो. पाटील यांनी या प्रकरणी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शासनाने या प्रकरणाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला.
शासनाच्या ११ जून २०२६ रोजीच्या पत्रानुसार, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ च्या निकषांनुसार पात्र लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्याज आकारणी करू नये, असा आदेश १३ मार्च २०१८ रोजी जारी करण्यात आला होता. मात्र जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या आदेशाचे उल्लंघन करून शेतकऱ्यांकडून व्याजाची वसुली केल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान, याच तक्रारीत श्री. गुलाबराव बाबुराव देवकर यांनी पदाचा गैरवापर करून आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपांची चौकशीही सुरू असून हे प्रकरण शासन स्तरावर न्यायप्रविष्ट असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शासनाने आता विभागीय सहनिबंधकांना बँकेविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल तातडीने शासनास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे जिल्ह्यातील शेतकरी व सहकार क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने लढा
या संदर्भात सरपंच सुरेशआप्पा पाटील यांनी सांगितले की, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करण्यात आले असल्याने संबंधितांवर कारवाई व्हावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे. शासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


