आखाडा | जळगाव : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांच्या संभाव्य माघारीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, ही माघार केवळ राजकीय समजुतीपोटी आहे की त्यामागे पडद्याआड कोणती ‘शक्ती’ कार्यरत आहे, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. महायुतीच्या नेत्यांकडून एका बाजूला मनधरणीचे प्रयत्न सुरू असतानाच, दुसरीकडे समोर आलेल्या एका शासकीय पत्रामुळे या संपूर्ण प्रक्रियेत ‘दबाव तंत्राचा’ वापर तर झाला नाही ना? असा संशय बळावला आहे.
दरम्यान, गीते यांनी जर जाहीर माघार घेतली तर जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे या देखील माघार घेतात याकडे लक्ष लागले आहे. कारण, काळे यांनी प्रचार सुरू ठेवला आहे, तसेच त्यांच्या माघारीसाठी फारसे प्रयत्न देखील होताना दिसत नाही.
काय आहे ‘त्या’ सरकारी पत्राचे रहस्य?
राजकीय वर्तुळात सध्या राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार सहसचिवांनी उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त सरकारी वकिलांना पाठवलेले एक पत्र अत्यंत चर्चेत आहे. या पत्रामध्ये गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांना नाशिकमधील गाजलेल्या म्हाडा घोटाळा प्रकरणात उच्च न्यायालयाने जो अटकपूर्व जामीन दिला आहे, त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या सूचना करण्यात आल्याचे समजते.
टायमिंगवर प्रश्नचिन्ह: धक्कादायक बाब म्हणजे, हे पत्र ७ मे २०२६ रोजी तयार झाले होते. परंतु, गोकुळ गीते आणि गणेश गीते यांनी १ जून रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि नेमक्या त्याच दिवशी (१ जून) हे पत्र अधिकृतपणे प्राप्त झाले. या संशयास्पद ‘टायमिंग’मुळे गणेश गीते यांच्यावरील कायदेशीर कारवाईची भीती दाखवून गोकुळ गीते यांचे बंड मोडून काढण्याचा हा प्रयत्न होता का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
संकटमोचकांची धाव आणि दराडे बंधूंची ‘वेटिंग’
या संपूर्ण घडामोडींनंतर महायुतीचे संकटमोचक मानले जाणारे शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत तातडीने विशेष विमानाने नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांच्यासोबत भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनीही थेट गीते बंधूंच्या निवासस्थानी धाव घेतली.
या हाय-व्होल्टेज बैठकीदरम्यान एक रंजक चित्र पाहायला मिळाले. मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन आणि गीते बंधू मुख्य खोलीत खलबते करत असताना, महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे आणि आमदार किशोर दराडे यांना बाजूच्या खोलीत ताटकळत बसावे लागले. यावरून या बंडखोरीचे गांभीर्य किती मोठे होते, याचा अंदाज येतो.
देहबोलीतून नाराजी उघड; शब्दाचा आदर की दबाव?
दीर्घकाळ चाललेल्या या नाट्यमय घडामोडींनंतर गोकुळ गीते यांनी अखेर माघार घेण्याची तयारी दर्शवली असली, तरी त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगून जात होते. बैठकीदरम्यान गीते यांची देहबोली अत्यंत शांत, गंभीर आणि संथ होती. त्यांच्या चेहऱ्यावर उघडपणे नाराजी दिसून येत होती.
त्यामुळे गोकुळ गीते यांनी घेतलेला माघारीचा निर्णय हा स्वेच्छेने, ज्येष्ठ मंत्र्यांचा शब्द राखण्यासाठी घेतला आहे की ‘सुप्रीम’ कारवाईच्या दबावापोटी, हा प्रश्न नाशिकच्या राजकीय वर्तुळात अनुत्तरितच आहे. दरम्यान, या संपूर्ण वादावर अद्याप गीते बंधू किंवा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
“तोपर्यंत जळगावात माघार नाही…” रेश्मा काळे यांनी थेट ‘जोपर्यंत नाशिकचा निर्णय होत नाही, तोपर्यंत जळगावातून मागे हटणार नाही’ अशी आक्रमक भूमिका घेतली होती. आता नाशिकमध्ये गोकुळ गीते यांचे बंड थंड पाडण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले असले, तरी जळगावात रेश्मा काळे आपली बंडखोरी मागे घेणार की भाजप उमेदवाराची डोकेदुखी वाढवणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी जळगावातही बंडखोरी शमवण्यासाठी स्वतः ताकद लावली आहे, मात्र रेश्मा काळे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने नाशिकचा ‘फॉर्म्युला’ जळगावात चालणार का? की तिथे महायुतीला मोठा फटका बसणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.


