आखाडा | मुंबई: राज्यातील कर्जबाजारी बळीराजाला दिलासा देण्यासाठी जाहीर झालेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’च्या अंमलबजावणीने आता वेग घेतला आहे. नुकतीच महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत या ऐतिहासिक कर्जमाफीवर मंजुरीची मोहोर उमटवली असून, त्याचा अध्यादेशही (GR) जारी केला आहे. यानंतर आता शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे बँकेत कधी जमा होणार, याची उत्सुकता लागली होती; याबाबत आता अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या योजनेसाठीचे अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) आता पूर्णपणे तयार झाले असून, पुढील आठवड्याभरात बँकांकडून शेतकऱ्यांची सर्व माहिती या पोर्टलवर उपलब्ध करून घेतली जाणार आहे.
५६ लाख शेतकऱ्यांना होणार थेट फायदा
सुमारे ३६,५८५ कोटी रुपयांच्या या भव्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे.
-
पूर्ण कर्जमुक्ती: ज्या शेतकऱ्यांकडे २ लाख रुपयांपर्यंतचे (मुद्दल व व्याजासह) कर्ज थकीत आहे, अशा १६ लाख ४८ हजार शेतकऱ्यांमधील १७.५५ लाख कर्ज खाती पूर्णपणे नील केली जाणार आहेत. यासाठी सरकारवर १४,७५४ कोटी रुपयांचा बोजा पडेल.
-
नियमित कर्ज भरणारांचा सन्मान: जे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करतात, त्यांना केवळ शासकीय सन्मानच दिला जाणार नाही, तर विशेष प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे.
शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करण्याची गरज नाही!
या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात किंवा ऑनलाईन केंद्रावर रांगा लावण्याची गरज पडणार नाही.
अशी असेल प्रक्रिया:
बँका स्वतः त्यांच्याकडील पात्र शेतकरी कर्जदारांची सर्व माहिती थेट शासकीय संकेतस्थळावर अपलोड करतील. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात जेव्हा बायोमेट्रिक किंवा इतर ओळख प्रमाणीकरण (Verification) केले जाईल, तेव्हा शेतकऱ्यांना बँकांनी अपलोड केलेली आपली माहिती पाहता येईल. ती माहिती अचूक असल्याची खात्री करून शेतकरी आपले प्रमाणीकरण पूर्ण करू शकतील.
२ लाखांवरील कर्जदार आणि नियमित कर्जदारांसाठी काय?
-
२ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणारे शेतकरी: ज्यांचे कर्ज २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा २ लाख ९० हजार शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. त्यांना २ लाखांवरील अतिरिक्त थकबाकी भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंतची मोठी मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ही अतिरिक्त रक्कम भरताच, सरकार त्यांच्या खात्यात २ लाख रुपयांची कर्जमाफी जमा करेल.
-
प्रोत्साहनपर अनुदान: प्रामाणिकपणे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यातील २३.६३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहे.
शासनाच्या या जलद हालचालींमुळे यंदाचा खरीप हंगाम सुरू असतानाच लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार हे आता स्पष्ट झाले आहे.

