आखाडा लाईव्ह | जळगाव : केतकी पाटील यांचे नाव विधानपरिषद साठी गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांच्याकडून पुढे केले जात असताना, नंदकिशोर महाजन यांचे नाव पुढे कसे आले..? हा विषय जिल्ह्यातील राजकीय मंडळींपासून ते सर्वसामान्य पर्यंत उत्सुकतेचा झाला आहे.
आता ही उत्सुकता आखाडाच्या माध्यमातून आखाडाचा वाचकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत, गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांच्याविरोधात जाण्याची सहसा हिंमत जिल्ह्यातील भाजपचे नेते करत नाहीत, मात्र केतकी पाटील यांच्या नावासाठी गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण हे आग्रह धरत असताना, त्यांना बायपास करून जिल्ह्यातील दोन नेत्यांनी नंदकिशोर महाजन यांच्यासाठी बॅटिंग करत त्यांची उमेदवारी अक्षरशः खेचून आणली. एवढेच नव्हे तर गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण , विशेष करून गिरीश महाजन यांना सामाजिक गणितात अडचणीत देखील आणण्याचे काम भाजपच्या दोन नेत्यांनी केले आहे. आता गिरीश महाजन यांना कसे अडचणीत आणले आहे, ते आपण पाहू…
१. गिरीश महाजन केतकी पाटील यांच्यासाठी आग्रही होते, यासह नंदू अडवाणी व अमोल शिंदे यांचे नाव आघाडीवर होते, सामाजिक गणित पाहिले तर लेवा, सिंधी आणि मराठा समाजाचा समावेश होता. जर गिरीश महाजन यांच्या पसंतीच्या उमेदवाराला डावलून जर नंदकिशोर महाजन यांची उमेदवारी झाली तर आपसूक या उमेदवारीचे बिल गिरीश महाजन यांच्या वर फाटेल याची दक्षता भाजपच्या बी टीम ने घेतली आहे.
२. गिरीश महाजन यांनी ही उमेदवारी दिली त्याचीच चर्चा होईल आणि गिरीश महाजन यांनी केतकी पाटील यांच्या माध्यमातून लेवा समाजाची उमेदवारी दुर केली, नंदु अडवाणी यांच्या माध्यमातून सिंधी समाजाची आणि अमोल शिंदे यांच्या माध्यमातून मराठा समाजाला डावललं हीच चर्चा या माध्यमातून सुरु झाली, आणि गिरीश महाजन यांनी नंदकिशोर महाजन यांच्या माध्यमातून गुर्जर समाजाला उमेदवारी देत, स्वत:च्या समाजाचे नेतृत्व पुढे आणण्याची निती राबविली असल्याची चर्चा यामुळे सुरु झाली.
३. भाजपच्या बी टीमकडून चांगल्या रणनितीने आणि राजकीय तंत्र वापरून गिरीश महाजन यांना नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून चांगलाच शह देण्याचा प्रयत्न केला आहे. या उमेदवारीत जरी गिरीश महाजन यांचा समावेश नसला तरी लेवा, मराठा व सिंधी समाजाच्या नजरेत गिरीश महाजन हे मात्र व्हिलन ठरविण्यात भाजपची बी टीम यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे.
जळगाव शहरातील सत्ताकेंद्र एकाच व्यक्तीकडे ठेवण्याचा प्रयत्न…
जर केतकी पाटील व नंदू अडवाणी यांना संधी मिळाली असती व ते आमदार झाले असते तर जळगाव शहरातील भाजपचे सत्ता केंद्र आमदार राजूमामा भोळे यांच्यावरुन अन्य आमदार म्हणजे नंदू अडवाणी किंवा केतकी पाटील यांच्याकडे गेले असते. आधीच महापालिकेतील महापौर व अन्य नगरसेवक राजूमामा भोळे यांच्यापासून दुर आहेत, त्यात मनपातील या नाराज नगरसेवकांना जर शहरातच दुसरा आमदार मिळून गेला असता तर राजूमामा भोळे यांच्याशी जी काही गरज अन्य नगरसेवक व महापौरांना लागते, ती गरज देखील लागली नसती…, त्यामुळे नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीने जळगाव शहरातील भाजपचे सत्ता केंद्र हे राजूमामा यांच्याकडेच राहिले आहे. त्यामुळे भाजपच्या बी टीमचे एक सदस्य कोण आहेत..? हे आता सांगण्याची गरज नाही.
रावेरमधील गड मजबूत करण्याचा प्रयत्न ..
रावेर लोकसभेत गेल्या निवडणुकीत रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळू नये म्हणून भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केले. त्यात गिरीश महाजन यांचे नावही अनेकदा पुढे केले जाते, रक्षा खडसे यांनी आपली ताकद वापरून नक्कीच आपली उमेदवारी खेचून आणली, पुढे २०२९ ला ही उमेदवारी कायम राहिल याची शाश्वती नाही, रक्षा खडसे यांना काही जणांकडून गुर्जर या जातीच्या खासदार म्हणून पाहिले जाते, मात्र दुसरीकडे रक्षा खडसे या लेवा समाजाच्याच उमेदवार ठरतात, आता २०२९ मध्ये भाजपच्या ए टीमकडून रक्षा खडसे यांचे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला जाईल, अशा वेळी जर एखाद्या जिल्ह्यातील मोठ्या व राज्याच्या मंत्रीमंडळात असलेल्या एका नेत्याला केंद्रावर जायचे राहिल तेव्हा आधीच एक गुर्जर आमदार असताना गुर्जर खासदार का..? यासाठी नंदकिशोर महाजन यांनाच आताच उमेदवार केले गेले आहे. यासह जर रक्षा खडसे यांचे तिकीट कापले, तर आमदारकी लढण्यासाठी नंदकिशोर महाजन यांचे नाव विधानसभेत पुढे केले जाऊ शकते, त्यामुळे आता नंदकिशोर महाजन यांना विधानपरिषदेत पाठविले गेले आहे. त्यामुळे भाजपच्या बी टीममधील दुसरे नाव कोणाचे…? हे आता सांगण्याची गरज नाही.
भाजपची ए टीम आक्रमक, तर बी टीम शांतपणे काटा काढणारी..
भाजपच्या बी टीम मध्ये अनेक पक्षाचे पदाधिकारी आता सक्रीय होत जात आहे, त्यामुळे भाजपची ए विरुद्ध बी टीम असा अंतर्गत कलह वाढणार हे नक्की आहे. भाजपची ए टीम म्हणजेच गिरीश महाजन, मंगेश चव्हाण व बी टीम रक्षा खडसे, राजूमामा भोळे यांच्यातही फरक आहे. ए टीम अधिक आक्रमक आहे, तर बी टीम शांतपणे काम करते…आता भविष्यात भाजपचा संघर्ष शिवसेना, राष्ट्रवादीशी जेव्हा सामना होईल, त्याआधी भाजपचा संघर्ष भाजपच्या अंतर्गत सुरु होणार आहे.

