आखाडा | मुंबई: राज्यात गुटखा, पानमसाला आणि अन्न-औधधांमधील भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही. आपल्या कडक कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची धुरा सांभाळताच राज्यभरात कारवाईचा धडाका लावला आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही, असा कडक इशारा देत मुंढे यांनी आता थेट नागरिकांनाच तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी प्रशासनाकडून अधिकृत टोल फ्री क्रमांक आणि ई-मेल आयडी जारी करण्यात आला आहे.
अनेकदा नागरिकांना अन्न किंवा औषधांमधील भेसळीबाबत कुठे तक्रार करावी हे माहीत नसते. हीच अडचण दूर करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना थेट तक्रार करण्यासाठी एक हक्काचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.
येथे करा थेट तक्रार:
जर तुम्हाला जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ किंवा गुटखा-पानमसाल्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे आढळल्यास तुम्ही खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता:
-
टोल फ्री क्रमांक: १८००२२२३६५ (1800222365)
-
ई-मेल आयडी: jc-foodhq@gov.in
६ दिवसांत २०३ छापे, १०२ जणांना बेड्या!
तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच एफडीएने (FDA) राज्यभरात धडक मोहीम राबवली आहे. गेल्या ६ दिवसांत अन्न व औषध प्रशासनाने तब्बल २०३ ठिकाणी छापे टाकले असून, यादरम्यान १०२ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणारी राज्यभरातील जवळपास ६८ दुकाने आणि हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत. अनेक गोदामांना देखील सील ठोकण्यात आले आहे.
भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी मुंढेंची नियुक्ती
गेल्या काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन खाते लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सातत्याने चर्चेत आले होते. या विभागाची प्रतिमा सुधारण्यासाठी आणि गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने तुकाराम मुंढे यांची या पदावर बदली केली. २५ मे रोजी पदभार स्वीकारल्यापासूनच त्यांनी आपल्या आक्रमक शैलीत कामाला सुरुवात केली असून, आगामी काळात ही कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे


