आखाडा लाईव्ह….| जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण करणाऱ्या जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवाराचा तिढा अखेर सुटल्याची माहिती मिळत आहे. महायुतीमधील जागावाटपात ही जागा भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वाट्याला आली असून, भाजपने सर्वांनाच धक्का देत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मुंबईतील राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून, उद्या सोमवारी सकाळी ११ वाजता याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
दिग्गजांना मागे टाकत महाजन यांना संधी
जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून अनेक दिग्गज आणि तरुण चेहऱ्यांची नावे चर्चेत होती. यात प्रामुख्याने केतकी पाटील आणि अमोल शिंदे यांची नावे आघाडीवर मानली जात होती. पक्ष कोणाला संधी देणार यावर जोरदार दावे-प्रतिदावे केले जात होते. मात्र, ऐनवेळी भाजपने आपले पारंपारिक ‘धक्का तंत्र’ वापरत थेट नंदकिशोर महाजन यांचे नाव पुढे करून राजकीय समीक्षकांना चकित केले आहे
मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय
नंदकिशोर महाजन हे राज्याचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत खंदे आणि निकटवर्तीय समर्थक मानले जातात. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले असून, जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. याशिवाय, भाजपच्या संघटनात्मक बांधणीत अत्यंत ‘निष्ठावंत’ कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. याच निष्ठा आणि अनुभवाची पावती म्हणून पक्षाने त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकल्याची चर्चा आता राजकीय आखाड्यात रंगली आहे.
उद्या सकाळी होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


