मुंबई | आखाडा विशेष प्रतिनिधी : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीमधील जागावाटपाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीने आपल्या घटक पक्षांमध्ये जागांचे वाटप निश्चित केले असून यामध्ये काही जागांवर जुन्याच पक्षांना प्राधान्य देण्यात आले आहे, तर काही जागांवर अदलाबदल करण्यात आली आहे.
भाजपच्या वाट्याला सर्वाधिक ११ जागा
महायुतीमध्ये नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्वाधिक जागांवर आपला दावा मजबूत केला आहे. यामध्ये सोलापूर, जळगाव, धाराशिव-लातूर-बीड, भंडारा गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती आणि नागपूर या आपल्या हक्काच्या जागा भाजपने स्वतःकडेच राखल्या आहेत. याशिवाय, पूर्वी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडे असलेल्या काही जागा खेचून आणण्यात भाजपला यश आले आहे.
शिवसेना ४ आणि राष्ट्रवादीला २ जागा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाणे, नाशिक, परभणी-हिंगोली आणि यवतमाळ या जागांवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुणे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागा कायम ठेवण्यात आल्या आहेत.
📊 महायुतीचे मतदारसंघनिहाय जागावाटप (तक्ता):
| मतदारसंघ | आधीचे आमदार (पक्ष) | आत्ता ही जागा कुणाला? |
| पुणे | अनिल भोसले (राष्ट्रवादी) | राष्ट्रवादी |
| अहिल्यानगर | अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी) | भाजप |
| सांगली-सातारा | मोहनराव कदम (काँग्रेस) | भाजप |
| सोलापूर | प्रशांत परिचारक (भाजप) | भाजप |
| ठाणे | रवींद्र फाटक (शिवसेना) | शिवसेना |
| नाशिक | नरेंद्र दराडे (शिवसेना) | शिवसेना |
| जळगाव | चंदूभाई पटेल (भाजप) | भाजप |
| धाराशिव-लातूर-बीड | सुरेश धस (भाजप) | भाजप |
| परभणी-हिंगोली | विप्लव बाजोरिया (शिवसेना) | शिवसेना |
| छ. संभाजीनगर-जालना | अंबादास दानवे (शिवसेना उबाठा) | भाजप |
| रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग | अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी) | राष्ट्रवादी |
| नांदेड | अमर राजूरकर (काँग्रेस) | भाजप |
| भंडारा गोंदिया | परिणय फुके (भाजप) | भाजप |
| वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली | रामदास आंबटकर (भाजप) | भाजप |
| अमरावती | प्रवीण पोटे (भाजप) | भाजप |
| यवतमाळ | दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना उबाठा) | शिवसेना |
| नागपूर | चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) | भाजप |


