जळगाव/ठाणे (आखाडा नेटवर्क) : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेसाठी एका नव्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र आणि अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांना शिवसेनेकडून (शिंदे गट) मैदानात उतरवले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याने चौधरी यांच्या नावाचा विचार गंभीरतेने सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
- शिंदे पिता-पुत्रांचे विश्वासू शिलेदार
सुनील चौधरी हे मूळचे जळगावचे असले तरी त्यांनी ठाणे जिल्ह्यात आपल्या राजकीय कौशल्याच्या जोरावर मोठी पकड निर्माण केली आहे. राज्याचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत निष्ठावंत आणि निकटवर्तीय सहकारी म्हणून चौधरी यांची ओळख आहे. अंबरनाथ नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर ठाणे पट्ट्यात आपली स्वतंत्र आणि मजबूत ओळख निर्माण केली आहे. - ठाण्याच्या जागेवर शिवसेनेचाच दावा
महायुतीच्या जागावाटपाच्या अंतर्गत गणितानुसार, ठाणे-पालघर हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार हे आता स्पष्ट झाले आहे. या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेतील अनेक बडे नेते आणि इच्छुक उत्सुक आहेत. मात्र, पक्षातील अंतर्गत समीकरणे आणि निष्ठावंतांना न्याय देण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका पाहता, सुनील चौधरी यांचे नाव सध्या शर्यतीत सर्वात पुढे असल्याचे बोलले जात आहे. - जळगावकरांचे लक्ष ठाण्याकडे!
जळगावच्या सुपुत्राला थेट ठाणे सारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या बालेकिल्ल्यातून आमदारकीची संधी मिळणार का? याकडे आता संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अंतिम निर्णय प्रक्रियेत एकनाथ शिंदे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


