आखाडा लाईव्ह Exclusive.. | जळगाव: विधान परिषदेच्या जळगावच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत सुरुवातीपासूनच मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर भाजपने ही जागा आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवले असले तरी, उमेदवारी जाहीर करताना एक मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. भाजपचे ‘संकटमोचक’ मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन आणि ‘रायझिंग स्टार’ आमदार मंगेश चव्हाण यांच्या पसंतीला डावलून, पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून निष्ठावान पदाधिकारी नंदकिशोर महाजन यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आली आहे.
डॉ. केतकी पाटील यांच्यासाठी वरिष्ठ नेत्यांचा मोठा आग्रह असतानाही, अचानक नंदकिशोर महाजन यांचे नाव कसे पुढे आले? यामागची ‘इनसाईड स्टोरी’ अतिशय रंजक आहे.
डॉ. केतकी पाटील यांचे नाव मागे का पडले?
मंत्री गिरीश महाजन यांचा मूळ आग्रह नाशिकच्या जागेसाठी होता. मात्र, ती जागा शिवसेनेने न सोडल्याने महाजनांनी जळगावच्या जागेवर हक्क सांगितला. त्यांनी आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी दोन वर्षांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. केतकी पाटील यांचे नाव प्रकर्षाने पुढे केले होते. मात्र, या नावाला खालील कारणांमुळे ब्रेक लागला:
- अंतर्गत विरोध: डॉ. पाटील या नुकत्याच पक्षात आल्या असल्याने, त्यांच्या नावाला भाजपच्याच काही पदाधिकारी आणि नगरसेवकांचा अंतर्गत विरोध होता. महाजन-चव्हाणांच्या दबदब्यामुळे हा विरोध उघडपणे समोर आला नसला, तरी वरिष्ठांपर्यंत याची कुणकुण लागली होती.
- धोक्याची घंटा: जर डॉ. पाटील यांना उमेदवारी दिली असती, तर शिवसेनेकडून तगडा उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू होती. अशा स्थितीत भाजपमधील अंतर्गत नाराजी पक्षाला जड गेली असती.
नंदकिशोर महाजन यांनी बाजी कशी मारली?
उमेदवार देताना पक्ष संघटनेतील कामाचा प्राधान्याने विचार व्हावा, असा आग्रह वरिष्ठांकडे धरण्यात आला होता.
नंदकिशोर महाजन यांच्या निवडीमागे ही प्रमुख कारणे ठरली:
- १.संघटनात्मक काम: इच्छुक उमेदवार नंदकुमार आडवाणी आणि चंदुलाल पटेल यांच्या तुलनेत नंदकिशोर महाजन यांचे पक्ष संघटनेतील काम आणि योगदान उजवे ठरले.
- २.रावेर फॅक्टर: आतापर्यंत विधान परिषदेसाठी रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवार दिला गेला नव्हता, त्यामुळे भौगोलिक समतोल साधला गेला.
- ३.मित्रपक्षाची पसंती: महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या आमदारांचे मतही जाणून घेण्यात आले. तेव्हा त्यांनी इतर नावांपेक्षा नंदकिशोर महाजन यांच्याच नावाला पसंती दर्शवली.
- ४.आमदार-खासदारांचा पाठिंबा: भाजपच्याच काही स्थानिक आमदार आणि खासदारांनी केतकी पाटलांऐवजी नंदकिशोर महाजनांच्या नावासाठी वरिष्ठांकडे आग्रह धरला होता.
गिरीश महाजनांचे पक्षातील वजन घटतेय?
या संपूर्ण राजकीय घडामोडींमधून एक मोठा संदेश जात आहे. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही मंत्री गिरीश महाजन यांना आपल्या पसंतीचा उमेदवार देता आलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय असूनही, भाजपच्या वरिष्ठ पक्ष संघटनेत महाजनांचे वजन हळूहळू कमी होत असल्याचे यावरून स्पष्ट दिसून येत आहे.


